दिव्य मराठी
बदलेल तुमची जगण्याची पद्धत
कला आणि आवडीचे रूपांतर व्यवसायात ,कल्पकता वापरून शोधली उद्द्योग संधी, बुकिंग करताच मिळते मागाल तिथे सेवा
फोन करा,गरमागरम चहा हजर
प्रत्येकात काही ना काही कला असते. थोड्या अधिक कल्पकतेने याच कलेचे रुपांतर उत्तम व्यवसायात होऊ शकते. शहरातील एका तरुण ऑनलाईन गरमागरम चहा विकण्याची उद्योग संधी शोधून हे दाखवून दिले आहे. त्याला स्वतःला चहाची भयंकर आवड आणि तो उत्तम बनवताही येतो. तेच भांडवल समजून त्याने फोनवर मागेल त्याला अन् मागेल तिथे चहा देण्याचा उद्योग सुरु केला. रोज किमान १ हजार कप चहा तो शहरभरात पोहोचवतो.आता तर अगदी वेबसाईटवरही लोक त्यांच्या या चहाची बुकिंग करतात. शहरभरात त्यांच्या या चहाची चव चाखली जात असल्याचा त्याचा दावा आहे.
मार्केटिंगची नोकरी करताना शहरात राहणाऱ्या सुनिल पाटील नावाच्या तरुणाला ही अफलातून कल्पना सुचली. सुनिल हा स्वतःचा चहा शौकीन.आपल्याला चवदार चहा लागतो. इतरांनाही असाच चहा आपण पुरविला तर.. हा विचार त्याच्या डोक्यात आला आणि लगेच त्याने ही कल्पना प्रत्यक्षात आणली. मुंबई-पुण्यासारख्या शहरात अशी सोय आहे,पण औरंगाबादेत प्रथमच ही भन्नाट 'आयडिया' सुनिलने आणली आहे.
फोनवर बुकिंग
सुरुवातीला सुनिलने खासगी कार्यालयांमध्ये जाऊन बुकिंग केले. पत्रके वाटली. आता फोनवर शहरात तो सर्वत्र चहापोहोचवतो. लोकांच्या आठवणीतला चहा विकायचा होता. त्यामुळे सुनीलने शहरात पहिल्यांदाच फोनच्या माध्यमातून मागेल तिथे चहा देण्यास सुरुवात केली. फोन येताच काही मिनिटांत तो तेथे चहाचा कप हजर करतो. हडको-सिडको, गजानन महाराज मंदिर परिसर, वामन हरी पेठे ज्वेलर्सचे जालना रोडवरील प्रतिष्ठान,जिल्हाधिकारी कार्यालय, एमआयडीसी या भागातून नित्य फोन येतात.तेथे मी मागणीनुसार माझा चहा पाठवतो.
प्लास्टिकचा वापर नाहीच
बऱ्याच ठिकाणी प्लास्टिकच्या कपात चहा दिला जातो.पण या कपात पॉलिव्हिलीन क्लोराईड नावाचा घातक रासायनिक पदार्थ असतो. त्यामुळे मी पेपर ग्लासमध्ये चहा देतो. शिवाय जनजागृतीही करतो. लोकांना उलट आरोग्यासाठी चहा देतो.
सुनिल पाटील.
रोज १ हजार कप विक्री
हा उपक्रम लोकांना आवडला आहे. सुनीलची पत्नी शीतलही या कामात त्याला मदत करतात. त्याने ७ जणांचा एक ग्रुपच तयार केला आहे. शहरातील विविध भागांत ते चहा पोहोचवतात. प्रत्येकाला रोजगार मिळाला असून त्यांना १० ते १५ हजार रुपये महिन्याकाठी मिळतात. सकाळी सात ते रात्री आठपर्यंत हा चहा मागेल तिथे मिळतो.
आयुर्वेदीक आरोग्यदायी चहा
माझ्या चहा आरोग्यदायी असल्याचा सुनीलचा दावा आहे. हा चहा चांगले दुध, विलायची ,दालचिनी ,सुंठ ,लवंग, काळी मिरी, जेष्ठमध, जायफळ, गवती चहा आणि तुळस टाकून बनवला जातो.