OUR STORY
आज आपण भेटणार आहोत....एका संघर्षमय वादळी व्यक्तिमत्वाला...उद्योगाच्या नव्या वाटा निर्माण करणार्या उद्योगी तरूणाला...बेरोजगारांना आदर्श ठरेल अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला...सामाजिक बांधिलकी जपणार्या संवेदनशील मनाला....संघटनेचे नेतृत्व करणार्या अभ्यासु नेतृत्वाला...एका उत्कृष्ट वक्त्याला...एका आदर्श मित्राला...दिवसा स्वप्न पाहून साकारणार्या संघर्षमुर्तीला...प्रचंड मेहनती..जिद्दी स्वभावाला...गरीबीचे चटके सोसलेल्या व त्या जाणिवेतून जगणार्या कार्यकर्त्याला...
अर्थातच आमचे खास मित्र...आदरणीय सुनिल वाघ यांना...थेट...औरंगाबाद हून.......सुनिल वाघ पाटील
"जितनेवाले कोई अलग काम नही करते|
वो हर एक काम अलग ढंग से करते है"
यश तुमच्या हातात या पुस्तकातील या ओळी वाचताना आठवण येथे ती कॉल टी नावाची यशस्वी संकल्पना राबवणा-या जिद्दी व्यक्तीमत्व सुनिल वाघ यांची...सुनिलचा जन्म जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील संगमपुर या अत्यंत छोट्या गावात झाला.परिस्थिती बेताचीच. जिल्हा परिषद शाळेतच सुनिलचे 1 ली ते 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले.भोकरदन येथे 12 वी पर्यंतचे शिक्षण घेऊन पुढे नोकरीच्या शोधात औरंगाबाद गाठले.
औरंगाबादला आल्यानंतर पुढील शिक्षण घेत एका कोचिंग क्लासेसवर मार्केटिंगचा जॉब मिळाला.. एखादी गोष्ट लोकांना पटवून देण्याचे अजब कौशल्य सुनीलकडे आहे.यामुळेच सुनीलला पुढे टेस्ट सिरीज काउन्सलर म्हणून जबाबदारी मिळाली.याच काळात लग्न झाल्याने संसाराचा गाढाही सुरू झाला होता.पुढे सुनिलसह 3 मित्रांनी एकत्र येत टी.व्ही.सेंटर औरंगाबाद येथे ज्ञानार्जन सायंटिफीक नावाने क्लासेस सुरू केले.प्रचंड प्रतिसाद मिळाला परंतु यश मिळाल्यावर ते टिकवणेही अवघडच.समुहातील सदस्यांच्या अति महत्वाकांक्षेमुळे सुनिलला या क्लासेसमधून पायउतार व्हावे लागले.
आणि आता खऱ्या अर्थाने सुनीलच्या आयुष्यात संघर्ष सुरू झाला.( साल २०१४ ) कारण अर्थप्राप्तीच्या सर्व वाटा बंद झाल्या होत्या.कुटुंबाची ससेहोलपट सुरू झाली.घरभाडे,मुलाची फिस,पत्नीचा दवाखाना व रोजचा उदरनिर्वाह करणेही मुश्किल बनले.यावेळी सुनील सैराट अवस्थेत औरंगाबादच्या गल्लोगल्ली काम शोधत फिरत होता.शेजारच्या लहान मुलांकडे पाहत मुलगा विविध गोष्टीचा हट्ट करायचा पण मुलाची कशीबशी समजुत काढत सुनील व पत्नी हे दिवस कसे जातील याचा विचार डबडबलेल्या डोळ्यांनी करायचे..सुनीलच्या आयुष्यातला खूपच कठीण काळ होता.पण संघर्ष ज्याच्या रक्तातच आहे ती माणसं जगण्याच्या नव्या वाटा शोधतच असतात...
सुनीलनेही या परिस्थितीतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आसमंत भेदणारी गगनभरारी घेतली. शुन्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर होताच.आणि यातूनच स्वतःच्या गरजेपोटी सुनीलला नवी संकल्पना सापडली. एका टपरीवर चहा पिण्यासाठी सुनील उभा असताना तेथील गर्दी पाहून सुनील वेगळा विचार करू लागला.आपण चहाचे दुकान सुरू करूया, पण क्लासेसवरशिक्षक म्हणून सुनीलला लोकांनी पाहिलेले.आणि आता चहा विकताना पाहिले तर.याच भावनेतून औरंगाबाद या ऐतिहासिक नगरीत जन्म झाला तो कॉल टी या संकल्पनेचा.
सुरूवातीला सुनीलची पत्नी शितलने घरातच चहा बनवायचा व सुनीलने परिसरातील दुकाने,ऑफीस,शाळा येथे लोकांपर्यंत पोहच करायचा अशी व्यवसायाची सुरूवात झाली. उत्कृष्ट दर्जाचा चहा लोकांना मिळत गेल्याने मागणी वाढत होती त्यातच www.calltea.in
या नावाने वेबसाईट बनवून आधुनिक तंत्रज्ञानाची जोड या व्यवसायाला दिल्याने सुनीलचे हे कॉल टी चे लोन संपूर्ण महानगरात पोहचले.फक्त फोन करायचा 10 मिनिटात शहरात कोठेही चहा हजर ही संकल्पना लोकांना खूपच भावली.आज शहरात सुनील आणि इतर 16 होतकरू तरूण या व्यवसायात सहभागी आहेत.किमान 15 ते 20 हजार रूपये महिना कमाई सर्वजण या व्यवसायातून करत आहेत.
एक गंमतीशीर किस्सा सांगताना सुनील म्हणतो की, " माझा मुलगा मला विचारायचा बाबा मी पण चहाच विकायचा का ? त्यावर उत्तर देताना सुनील म्हणायचा. नाही बाळा तुला चहा नाही विकायचा तुला चहाचे मळे विकायचे आहेत. हे बाळकडू सुनील आपल्या लेकरात भरत आहे.
सुनील याच्या या हटके संकल्पनेची दखल विविध माध्यमातून घेण्यात आली.पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडणारा सुनील आज तरूणांना प्रेरणादायी आहे. आजवर
@दि.18 मार्च 2015 रोजी आकाशवाणी औरंगाबादवर सुनीलची प्रेरणादायी मुलाखत प्रसारित झाली.
@ दै.दिव्य मराठी या वर्तमानपत्राने...सुखद सोमवार अंतर्गत सुनीलच्या धडपडीतून उभा राहिलेल्या कॉल टी संकल्पनेची यशस्वी घौडदोड प्रसिद्ध केली.
@ राष्ट्रीय स्तरावरील अमृतवेल या मासिकातही सुनीलच्या कॉल टी संकल्पनेवर आधारित लेख प्रसिद्ध.
कॉल टी च्या माध्यमातून शहरात प्रसिद्ध झालेल्या सुनीलला सामाजिक कार्याचीही खूप आवड आहे.पर्यावरणाच्या दृष्टीनेही सुनीलने आदर्श उभा केला आहे.त्यामध्ये
@ चहासाठी प्लॅस्टिकचा कप न वापरता सुनील कागदी कपाचा वापर करतो व प्लॅस्टिक वापरासंबंधी जागृती करतो.
@ अनाथाश्रमात वर्षातून दोन वेळेस सुनील मोफत नाष्टा व चहा पुरवतो.
@ आजवर अनेक रक्तदान शिबिरातही सुनीलने सहभाग घेतला आहे.
@ विद्यार्थी सेवा समिती महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.
@उत्कृष्ट वक्ते म्हणूनही आजवर अनेक ठिकाणी सुनिलजी यांनी मार्गदर्शन केले आहे.
पहिला विजय मिळाल्यानंतर खरा योद्धा कधीच थांबत नसतो त्याचे पुढील लढाईचे नियोजन चालूच असते..सुनीलनेही भविष्यातील ध्येय व नियोजन तयार केले आहे..त्यामध्ये
@ संपूर्ण देशभरात कॉल टी संकल्पना राबवणे.
@ हजारो मुलांना रोजगार मिळवून देणे.
@ टॅकरने चहा पुरवठा करणे.
@ संपूर्ण महाराष्ट्रभर चहाची एकच चव रहावी अशी मशीन सुनील परदेशातील तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करत आहे.
आदरणीय सुनीलजी वाघ आपल्या संघर्षातून...स्वकर्तृत्वातून...कल्पकतेतून उभ्या राहिलेल्या कॉल टी या आपल्या संकल्पनेला सलाम...छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्शस्थानी ठेवत शुन्यातून विश्व निर्माण करण्याची आपली धडपड खूपच प्रेरणादायी आहे...कोणतेही काम छोटे नसते मन लावून करा व त्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट बना हा आदर्शच आपण चहाचा ऑनलाईन व्यवसाय उभा करून संपूर्ण महाराष्ट्राला घालून दिला आहे....
नोकरीच्या शोधात गाव सोडून आलेला सुनील आज हजारो बेरोजगारांना काम मिळवून देण्याचे स्वप्न बघतोय...सुनीलजी आपण प्रचंड मेहनती,जिगरबाज,ध्येयवेडे,जिद्दी,कल्पक आणि उत्साही आहात म्हणूनच क्षितिजाला गवसणी घालणारे यश आपण मिळवले...काम नाही म्हणून 3 महिने एक वेळेला जेवण करणारे आपण आज 15 जणांना रोजगार देऊन स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने उभे आहात...
ज्याचे भांडवल कष्ट आहे व जो बुद्धीला संपत्ती मानतो त्याला या जगात कोणीही पराभूत करू शकत नाही हा आपण स्वअनुभवातून जगाला दाखवून दिले...कॉल टी संकल्पनेच्या यशस्वितेसाठी आपल्या पत्नीचेही मोठे योगदान आहेच..लोकांची गरज ओळखून जो पावले टाकतो तोच खरा व्यावसायिक हे आपण स्वअनुभवातून सिद्ध केले आहे...आयुष्यात कितीही संकटे आली तरी जिद्दीने..हिंमतीने..लढलेच पाहिजे ही लढाई आपण लढलात व जिंकलात...
जिथे काम कराल तिथे सर्वोच्च योगदान द्या..ही शिवचरित्राची शिकवण आपण जगलात याचा अभिमान वाटतो...रडत बसू नका स्वकर्तृत्वावर इतिहास घडवायला शिका हे तुमच्याकडे पाहून म्हणावेच लागेल...सुनीलजी अनेक अडथळ्याची शर्यत पार करून आपण महाराष्ट्रासमोर उद्योगाच्या नव्या वाटा निर्माण केल्या आहेत...आपणांस आजवर एकही पुरस्कार मिळाला नाही हे तुमचे नव्हे समाज म्हणून आमचे दुर्दैव आहे की तुमचा सन्मानही आम्ही करू शकलो नाहीत याची मनाला खंत वाटत आहे...
सुनीलजी तुमची कॉल टी ही संकल्पना संपूर्ण देशभरात पोहचावी व मराठी उद्योजक म्हणून तुमच्या यशाचा झेंडा अटकेपार फडकत राहो...या मनपूर्वक शुभेच्छा....
🌷आज माझा ऊर आपला संघर्ष मांडताना अभिमानाने भरून आलाय...आपल्या धगधगत्या संघर्षाला लोकसांस्कृतिक मंच औरंगाबादचा क्रांतीकारी सलाम......
🌷आपल्या प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर आपली सर्व स्वप्ने नक्कीच पूर्ण होतील व आपण यशस्वी मराठी उद्योजक म्हणून देशभरात प्रसिद्ध व्हाल या शुभेच्छा......