रोजगार नोकरी संदर्भ- शनिवार, २० ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०१६
चहाच्या टपरीवरील गर्दी पाहून त्याच्या मनात विचार आला,की आपणही चहाचे दुकान सुरु करू.शिक्षक आणि मार्केटिंग काम केलेले असल्याने मन मानत नव्हते. रस्त्यावर चहा विकताना आपल्याला कुणी पहिले तर.. या भावनेनेच त्याच्या मनात विचारांचा काहूर माजला होता.
ऑनलाईनच्या खरेदीकडे युवकांचा कल वाढतो आहे.यामुळे पारंपारिक उद्योगांना फटका बसू लागला असताना या क्षेत्रात युवकांना नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत.रेडीमेड कपडे, किराणा, इलेक्ट्रोनिक्स वस्तू, दिवाळीचा फराळ,निवडलेली भाजी,ऑनलाईन बुक करून घरपोच मिळू लागला आहे.
"जितनेवाले कोई अलग काम नही करते|
वो हर एक काम अलग ढंग से करते है"
यश तुमच्या हातात या पुस्तकातील या ओळी वाचताना आठवण येथे ती कॉल टी नावाची यशस्वी संकल्पना राबवणा-या जिद्दी व्यक्तीमत्व सुनिल वाघ यांची...
गरीबीचे चटके सोसलेल्या व त्या जाणीवेतून यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास असलेल्या औरंगाबाद येथील सुनिल वाघ पाटील यांचा जीवनप्रवास थक्क करून सोडणारा आहे.
संघर्षाचा काळ
सुनिलचा जन्म जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील संगमपुर या अत्यंत छोट्या गावात झाला.परिस्थिती बेताचीच. जिल्हा परिषद शाळेतच सुनिलचे 1 ली ते 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले.भोकरदन येथे 12 वी पर्यंतचे शिक्षण घेऊन पुढे नोकरीच्या शोधात औरंगाबाद गाठले.
औरंगाबादला आल्यानंतर पुढील शिक्षण घेत एका कोचिंग क्लासेसवर मार्केटिंगचा जॉब मिळाला.. एखादी गोष्ट लोकांना पटवून देण्याचे अजब कौशल्य सुनीलकडे आहे.यामुळेच सुनीलला पुढे टेस्ट सिरीज काउन्सलर म्हणून जबाबदारी मिळाली.याच काळात लग्न झाल्याने संसाराचा गाढाही सुरू झाला होता.पुढे सुनिलसह 3 मित्रांनी एकत्र येत टी.व्ही.सेंटर औरंगाबाद येथे ज्ञानार्जन सायंटिफीक नावाने क्लासेस सुरू केले.प्रचंड प्रतिसाद मिळाला परंतु यश मिळाल्यावर ते टिकवणेही अवघडच.समुहातील सदस्यांनी काही किरकोळ कारण पुढे करून सुनिलला क्लासेसच्या संचालक पदावरून बाहेर केले. अतिशय मेहनतीने सुरु केलेल्या क्लासेसमध्ये सलग पाच वर्षे शिक्षक म्हणून काम केल्यानंतर बेरोजगार होण्याची वेळ आली होती.
आणि आता खऱ्या अर्थाने सुनीलच्या आयुष्यात संघर्ष सुरू झाला.( साल २०१४ ) कारण अर्थप्राप्तीच्या सर्व वाटा बंद झाल्या होत्या.कुटुंबाची ससेहोलपट सुरू झाली.घरभाडे,मुलाची फिस,पत्नीचा दवाखाना व रोजचा उदरनिर्वाह करणेही मुश्किल बनले.यावेळी सुनील सैराट अवस्थेत औरंगाबादच्या गल्लोगल्ली काम शोधत फिरत होता.शेजारच्या लहान मुलांकडे पाहत मुलगा विविध गोष्टीचा हट्ट करायचा पण मुलाची कशीबशी समजुत काढत सुनील व पत्नी हे दिवस कसे जातील याचा विचार डबडबलेल्या डोळ्यांनी करायचे..सुनीलच्या आयुष्यातला खूपच कठीण काळ होता.पण संघर्ष करण्याची तयारी असल्याने जगण्याच्या नव्या वाटा तो कायम शोधत होता...
नव्या वाटा
ऑफिसमधल्या सहकार्यांसोबत गप्पाटप्पा मारायच्या असोत किंवा मित्रांबरोबर थोडा वेळ स्पेंड करायचा असो, आठवण येते ती मस्त गरमागरम वाफाळत्या चहाची , तेंव्हा आपोआप पाय वळतात ते रस्त्यावरच्या टपरीकडे किंवा एका टी स्टॉलकडे पण हाच चहा जर पिझ्झासारखा एका क्लिकवर किंवा मेसेजवर तुमच्यापर्यंत आला तर ! किती मस्त होईल ना ! आता तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे हे ! हे शक्य झालेय, औरंगाबादमध्ये टेक्नोसेव्ही युगात हा चहासुद्धा हायटेक झाला आहे. औरंगाबादमधील लोकांना आता एका कॉलवर किंवा मेसेजवर ऑफिस, घर, संस्था या ठिकाणी १० मिनिटात चहा पोहोचतोय.औरंगाबादच्या सुनिल वाघ यांनी ही ऑनलाईन चहाची भन्नाट कल्पना अंमलात आणली आहे.
अशी सुचली कल्पना
चहा टपरीवरील चहा पिणाऱ्याची गर्दी कायम दिसत होती.संघर्षाचा काळ असल्याने प्रत्येक गोष्टीत सुनिल व्यवसायाच्या संधी शोधत होता. चहाच्या टपरीवरील गर्दी पाहून त्याच्या मनात विचार आला,की आपणही चहाचे दुकान सुरु करू. शिक्षक आणि मार्केटिंगचे काम केलेले असल्याने मन मानत नव्हते. रस्त्यावर चहा विकताना आपल्याला कुणी पहिले तर.. या भावनेनेच त्याच्या मनात काहूर माजला होता. पत्नीसोबत या कल्पनेविषयी चर्चा केली, घरात नव्या पाहुण्याची चाहूल लागली होती. त्या स्थितीत पत्नीने सुनिलला कायम साथ दिली. चहाची टपरी टाकण्याऐवजी 'कॉल ऑन टी' ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला.त्यातून 'कॉल टी' या भन्नाट उद्योगाला खऱ्या अर्थाने मूर्त रूप आले. 'टेक्नोसेव्ही' युगात हा चहासुद्धा 'हायटेक' करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रथम काही पत्रके प्रकाशित केली. औरंगाबाद येथील आजूबाजूच्या परिसरात वाटली. त्यातून थोडाफार प्रतिसाद मिळू लागला. सुनिलची पत्नी शीतल घरात चहा तयार करायची आणि सुनिल परिसरातील दुकाने,ऑफीस, शाळा येथे लोकांपर्यंत पोहोचता करायचा. व्यवसायाचा श्रीगणेशा झाला. उत्तम,स्वादिष्ट आणि 'हायजेनिक' चहा मिळत असल्याने ग्राहकांची मागणी वाढू लागली.मोबईलवर ऑर्डर घेण्याच्या सूचनाही येऊ लागल्या.
त्यामुळे सुनिलने www.calltea.in या नावाने वेबसाईट तयार करून आधुनिक तंत्रज्ञाची कास धरली. यामुळे सुनिलच्या 'कॉल टी' या कंपनीचा प्रसार संपूर्ण शहरभर झाला.फोन केल्यानंतर फक्त दहा मिनिटांत शहरातील कोणत्याही कानाकोपऱ्यात चहा पोहोचता करण्यात येतो.'कॉल टी' कन्सेप्ट ग्राहकांच्या पसंतीस उतरले असून,सध्या १२ ठिकाणी केंद्र सुरु झालेले आहेत. हे यश केवळ दोन वर्षात मिळवले आहे. २०१४ या वर्षी व्यवसायाचा श्रीगणेशा केला असून,दोन वर्षातच महाराष्ट्रात या नव्या संकल्पनेने भरारी घेतली आहे.त्याच्याकडे अभियंता,एमबीएचे शिक्षण झालेले सुद्धा आता
सामाजिक बांधिलकी
प्रारंभी दोघांपासून सुरु झालेल्या चहाच्या या आगळ्यावेगळ्या प्रयोगाने १८ जणांची टीम उभी झाली आहे. ही टीम चहा तयार करण्याचे काम करते. परिसरानुसार चहा वाटणाऱ्या मुलांची नेमणूक केलेली आहे.या माध्यमातून संपूर्ण औरंगाबाद शहराला ऑनलाईन चहा पुरविला जातो.महिन्याकाठी प्रत्येक कर्मचारी १० ते १५ हजार कमावतो आहे.ग्राहकांच्या जिभेला चव देणाऱ्या आणि आरोग्याची काळजी घेणारा चहा विकन्याकडेच त्यांचा कल असतो. याबरोबरच तो 'हायजेनिक' ही असला पाहिजे. त्यादृष्टीने त्यांनी चहामध्ये काही बदल केले.यासाठी मग चहामध्ये वेलची, सुंठ, आलं,जायफळ,तुळस,गवती चहा असे औषध घटक टाकून चहा बनविण्यात येतो. त्यामुळे हा चहा आरोग्यासाठी चांगला आहेच. ऑर्डरप्रमाणे चहा बनविला जात असल्यामुळे शिल्लक चहा परत परत चहा उकळून देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. त्यामुळेच चहा शिळा होवून त्यामध्ये कोणतीही रासायनिक प्रक्रिया निर्माण होण्याची शक्यता नसते. याबरोबरच चहा देण्यासाठी प्लास्टिक कपाचा वापर न करता, पेपर कपचा वापर केला जातो. यामुळे प्लास्टिकच्या कपमध्ये असणारा पॉलिव्हिलीन क्लोराईड नावाचा आरोग्याला घातक पदार्थ असतो. त्यामुळे हे कप वापरणे ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. याबाबतीत सुनिल वाघ जनजागृतीही करतात.
व्हिजन नेक्स्ट
म्हणतात ना,पहिला विजय मिळाल्यानंतर योद्धा सुद्धा कधीच थांबत नाही. त्याचे पुढील लढाईचे नियोजन चालत असते.सुनिलने भविष्यातील ध्येय व नियोजन तयार केलेले आहे.त्यात संपूर्ण देशभरात 'कॉल टी' संकल्पना राबवणे,हजारो मुलांना रोजगार निर्माण करून देणे, टँकरने दुध नव्हे तर चहाचा पुरवठा करणे. संपूर्ण महाराष्ट्रभर चहाची एकच चव राहावी, अशी मशीन सुनिल परदेशातील तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करत आहे. ऑनलाईन चहाच्या व्यवसायात यश संपादन केल्यानंतर आता सुनील ज्येष्टांसाठी आणि शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी घरगुती पद्धतीने जेवण करून ते पुरविण्याचा विचार करीत आहे. ग्राहकांना चांगली सेवा देण्यावर भर असल्याने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आहे.त्यासाठी एक ऍपही विकसित केले आहे. थोडयाच दिवसांत या नव्या ऍपच्या मदतीने औरंगाबादमधील चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे.
कल्पकता, जिद्द
व्छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्शस्थानी ठेवत शून्यातून विश्व निर्माण करण्याची त्यांची धडपड सर्वांनाच प्रेरणादायी अशी आहे. कोणतेही काम छोटे नसते. मन लावून काम करा व त्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट बना, हा आदर्शच आपण चहाचा ऑनलाईन व्यवसाय उभा करून संपूर्ण राज्यातील युवकांना दिला आहे. तीन महिने एकवेळचे जेवण करणारे सुनिल यांनी आज १८ जणांना रोजगार दिला आहे. स्वतःच्या पायावर अभिमानाने उभे केले आहे. ज्याचे भांडवल कष्ट आहे व जो बुद्धीला संपती मानतो, त्याला या जगात कोणीही पराभूत करू शकत नाही, हे सुनीलने स्वानुभवातून दाखवून दिले आहे. युवकांनो,आपल्या प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर आपली सर्व स्वप्नं नक्कीच पूर्ण होतील व आपणही यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास येऊ शकता. फक्त हवी कोणतेही काम करण्याची तयारी. जवळपासचे लोक काय म्हणतील, यापेक्षा चांगली सेवा कशी देता येईल, यावर लक्ष केंद्रित करा. १०० रुपयांत व्यवसाय सुरु होऊ शकतो. सुनिलने ५० रुपयांच्या भांडवलातून हा व्यवसाय उभा केला आहे. आपल्या हातात जेवढे आहे ,तेवढयातच आपले 'स्टार्ट अप' करा.